
जमिनीवर लटकणाऱ्या तारा ठरताहेत 'यमदूत'
लातूर, 24 जून (हिं.स.)। उदगीर तालुक्यातील कौलखेड येथील तांड्यावर महावितरणच्या भोंगळ आणि धोकादायक कारभारामुळे एका निष्पाप शेळीचा विजेचा जोरदार शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर बराच वेळ उलटूनही वीज कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेतली नाही. या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनास्थळाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला असून, दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौलखेड तांडा परिसरात वीज वाहिन्यांचे खांब आणि तारा अत्यंत जीर्ण व धोकादायक स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी सर्व्हिस वायर आणि मुख्य वीजवाहिन्या जमिनीच्या अगदी जवळ लटकत आहेत. आज अशाच एका उघड्या पडलेल्या जिवंत वीजवाहिनीचा धक्का गोठ्याजवळ चरणाऱ्या एका शेळीला लागला. विजेचा तीव्र झटका बसल्याने ती शेळी जागीच गतप्राण झाली.शॉक लागून माणसाचा जीव गेला असता तर जबाबदार कोण? गावकऱ्यांचा सवाल:आज एका मुक्या जनावराचा जीव गेला, पण जर उद्या खेळणारी लहान मुले किंवा एखादा शेतकरी या तारेच्या संपर्कात आला आणि मोठी मानवी जीवितहानी झाली, तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल कौलखेड तांड्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राज्यात यापूर्वीही महावितरणच्या अशाच निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी आणि गुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेकदा ग्रामस्थांनी लेखी तक्रारी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता समोर येत आहे.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी:कौलखेड तांड्यातील सुजाण नागरिकांनी आणि पशुपालकाने या प्रकरणी महावितरणच्या संबंधित दोषी अभियंता आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित पशुपालकाला तातडीने आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी केली जात आहे. जर तालुक्यातील ग्रामीण भागातील हे लटकणारे वीज खांब आणि उघड्या तारा तात्काळ दुरुस्त केल्या नाहीत, तर महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तांड्यातील ग्रामस्थांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis