इराणच्या अणुस्थळांची तपासणी केली जाईल; हे होणारच- आयएईएचे प्रमुख राफेल ग्रोसी
टोकियो, 24 जून (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए)चे प्रमुख राफेल मारियानो ग्रॉसी यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण वक्तव्य करत, संस्थेचे निरीक्षक लवकरच इराणमधील युरेनियम संवर्धन केंद्रांना भेट देतील, असे संकेत दिले. अमेरिका आणि इराण यांच्यात य
इराणच्या अणुस्थळांची तपासणी केली जाईल; हे होणारच- आयएईएचे प्रमुख राफेल ग्रोसी


टोकियो, 24 जून (हिं.स.)।आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (आयएईए)चे प्रमुख राफेल मारियानो ग्रॉसी यांनी बुधवारी महत्त्वपूर्ण वक्तव्य करत, संस्थेचे निरीक्षक लवकरच इराणमधील युरेनियम संवर्धन केंद्रांना भेट देतील, असे संकेत दिले. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी झालेल्या अंतरिम कराराचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.संयुक्त राष्ट्रांच्या अणुनिगराणी संस्थेचे प्रमुख ग्रॉसी यांनी टोकियो येथे माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

गेल्या वर्षी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर तेहरानने आयएईए निरीक्षकांच्या अणुस्थळांवरील प्रवेशावर निर्बंध घातले होते. या केंद्रांमध्ये इराणने इतक्या प्रमाणात उच्च संवर्धित युरेनियमचा साठा केला असल्याचा अंदाज आहे की त्यातून सुमारे १० अणुबाँब तयार होऊ शकतात.मात्र, इराण सातत्याने आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचा दावा करत आला आहे. अण्वस्त्र कार्यक्रम नसल्याचा दावा करत असूनही ६० टक्क्यांपर्यंत युरेनियम संवर्धन करणारा इराण हा जगातील एकमेव देश आहे. हा स्तर अण्वस्त्र-निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या दर्जाच्या खूप जवळचा मानला जातो.

यापूर्वी अमेरिका आणि इराणने अणुकेंद्रांच्या तपासणीबाबत परस्परविरोधी विधाने केली होती. जपानमधील सुनामीग्रस्त फुकुशिमा दाइची अणुऊर्जा प्रकल्पात आयोजित पत्रकार परिषदेत ग्रॉसी म्हणाले, “मी राजकीय विधाने समजू शकतो. ती वास्तवाचा एक भाग असतात. मात्र, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे, हे महत्त्वाचे आहे.”ते पुढे म्हणाले, “त्या करारात अणुसामग्री आणि अणुकेंद्रांशी संबंधित सर्व हालचालींवर आयएईए देखरेख ठेवेल, असे स्पष्टपणे नमूद आहे.”

ग्रॉसी यांनी सांगितले, “यासाठी आम्हाला तेथे जाऊन तपासणी करावी लागेल. ती एका दिवसानंतर होवो, आठवड्यानंतर किंवा दहा दिवसांनी; पण ती होणारच, हे निश्चित आहे.” या कराराच्या यशासाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. करारानुसार इराणला आपल्या उच्च संवर्धित युरेनियमच्या साठ्याची संवर्धन पातळी कमी करावी लागणार आहे. ग्रॉसी यांच्या या वक्तव्यावर इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

मंगळवारी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी तेहरानमध्ये पत्रकारांना सांगितले होते की, गेल्या वर्षी अमेरिकेने बॉम्बहल्ल्यांचे लक्ष्य बनवलेल्या अणुस्थळांवर आयएईए निरीक्षकांना पाठवण्याची सध्या कोणतीही योजना नाही. त्यांचे हे वक्तव्य अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी एक दिवस आधी व्यक्त केलेल्या तपासणीच्या शक्यतेच्या दाव्याच्या विरोधात होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande