
तेहरान, 26 जून (हिं.स.)। होर्मुझ सामुद्रधुनीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या सुरक्षित सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या एका मालवाहू जहाजावर गुरुवारी हल्ला करण्यात आला आहे. ब्रिटिश लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी या व्यापारी जहाजावर अज्ञात प्रोजेक्टाइलद्वारे हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण आखाती प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ब्रिटिश लष्कराच्या यूकेएमटीओ (युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स) या सुरक्षा संस्थेने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अहवालानुसार, संबंधित मालवाहू जहाज संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (आयएमओ) यांनी मान्यता दिलेल्या विशेष सागरी मार्गावरून प्रवास करत होते. त्याचवेळी एक अज्ञात प्रोजेक्टाइल येऊन जहाजाला धडकले.हा विशेष सागरी मार्ग आखाती प्रदेशात अडकलेल्या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, या सुरक्षित मार्गावरच हल्ला झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये चिंता वाढली असून त्या अधिक सतर्क झाल्या आहेत.
प्राथमिक सुरक्षा अहवालानुसार, या अचानक झालेल्या हल्ल्यात जहाजाचे काही नुकसान झाले आहे. मात्र, जहाजावरील चालक दलातील एकाही सदस्याला दुखापत झालेली नाही. जहाजाच्या कॅप्टननेही सर्व कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. तसेच, समुद्रात तेलगळती किंवा पर्यावरणाचे कोणतेही नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही.सुरक्षा यंत्रणा आता जहाजावर डागण्यात आलेले प्रोजेक्टाइल नेमके कोणत्या प्रकारचे होते, याचा तपास करत आहेत.
दरम्यान, हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने कठोर इशारा दिला होता. तेहरानची परवानगी न घेता या जलमार्गातून प्रवास करणाऱ्या कोणत्याही जहाजाला सोडले जाणार नाही, असा इशारा इराणी लष्कराने दिला होता. तसेच, परवानगीशिवाय या मार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांविरोधात कठोर लष्करी कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
या धमकीनंतर लगेचच संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या सागरी मार्गावर हा हल्ला झाल्यामुळे या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील सागरी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode