
मॉस्को , 26 जून (हिं.स.)। तब्बल 4 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेला हा संघर्ष आजही सुरूच आहे. ताज्या घडामोडीत, रशियाने युक्रेनवर आतापर्यंतच्या युद्धातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर रशियाने आपल्या भूभागासह ताब्यात असलेल्या क्रिमिया प्रदेशावर मोठ्या प्रमाणात हल्ला झाल्याचा दावा केला आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी माहिती दिली की, त्यांच्या हवाई संरक्षण दलाने युक्रेनने डागलेले तब्बल ६६० ड्रोन पाडले आहेत. हा हल्ला रशियातील १२ वेगवेगळ्या प्रदेशांवर तसेच क्रिमिया द्वीपकल्प, काळा समुद्र आणि आझोव समुद्र परिसरात करण्यात आला. या मोठ्या ड्रोन हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन रशियाच्या तेल उत्पादन केंद्रांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर सातत्याने हल्ले करत आहे. पाश्चात्त्य अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, या रणनीतीमुळे रशियाच्या इंधन पुरवठ्यावर आणि लष्करी रसद व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे रणांगणावर रशियाची आक्रमक मोहीम मंदावली असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावरील दबावही वाढला आहे.
हा मोठा हल्ला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘४० दिवसांच्या प्रभावी मोहिमे’चे आदेश दिल्यानंतर अवघ्या काही तासांत झाला. हल्ल्यांची तीव्रता वाढवून रशियाला युद्ध समाप्त करण्यास भाग पाडणे, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षभरापासून अमेरिकेच्या शांतता प्रयत्नांना कोणतेही ठोस यश न मिळाल्यानंतर झेलेन्स्की यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्यामुळे मॉस्कोच्या दक्षिणेकडील तुला प्रदेशात एका घराचे नुकसान झाले असून एका महिलेचा जखमी झाल्याची माहिती आहे. तुलाचे राज्यपाल दिमित्री मिल्यायेव यांनी सांगितले की, नोव्होमोस्कोव्ह्स्क शहरातील वीजवाहिनी आणि एका औद्योगिक केंद्राचे नुकसान झाले आहे. काही स्वतंत्र माध्यमांच्या वृत्तांनुसार, तेथील रासायनिक कारखाना आणि जलविद्युत प्रकल्पात आग लागली आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, राजधानीच्या दिशेने येणारे ४७ ड्रोन पाडण्यात आले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे, रशियानेही युक्रेनच्या खार्किव प्रदेशावर जोरदार हल्ले केले. खार्किवचे प्रादेशिक प्रमुख ओलेह सिनियेहुबोव यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत झालेल्या रशियन हल्ल्यांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
रशियाने खार्किव आणि आसपासच्या १६ भागांवर मार्गदर्शित (गाइडेड) बॉम्ब आणि ड्रोनच्या साहाय्याने हल्ले केले. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने डागलेल्या १८९ ड्रोनपैकी १७४ ड्रोन हवेतच निष्प्रभ करण्यात आले. मात्र, सात इस्कंदर-एम बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी चार क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यावर आदळण्यात यशस्वी ठरली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode