
- मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
- ताणतणाव व्यवस्थापनासाठी 11 महिन्यांच्या करारावर नेमणार
तज्ज्ञ
रायगड, 24 जून (हिं.स.) : रायगड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या वाढत्या ताणतणावाचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 11 महिन्यांच्या करारावर कंत्राटी स्वरूपात मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यालय अधीक्षक श्रीमती वनिता मोरे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात विविध धर्म, जाती आणि समाजघटकांचे नागरिक वास्तव्यास असून वर्षभर विविध सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित केल्या जातात. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस दलावर असते. याशिवाय न्यायालयीन कामकाज, गुन्ह्यांचा तपास, कुटुंबापासून दूर राहून पार पाडावी लागणारी कर्तव्ये आणि सततच्या कामाच्या दबावामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी अनेकदा मानसिक तणावाखाली कार्यरत असतात.
या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे मनोबल उंचावणे आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपणे या उद्देशाने मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी आवश्यक मदत मिळणार आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, आठ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, 30 पोलीस ठाणे तसेच विविध दूरक्षेत्रे आणि पोलीस चौक्या कार्यरत आहेत. जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अशा विविध पदांवरील सुमारे 201 अधिकारी कार्यरत असून मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सेवेत आहेत.
माथेरानपासून पोलादपूरपर्यंत विस्तारलेल्या रायगड जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आणि डोंगराळ आहे. तसेच ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि नवी मुंबई या जिल्ह्यांच्या सीमांना लागून असल्याने येथे शहरीकरणाचा वेग वाढत आहे. विविध राज्यांतील तसेच परदेशातील नागरिकांची वाढती वर्दळ आणि वाढता कामाचा ताण लक्षात घेता पोलीस दलाच्या मानसिक आरोग्याच्या संवर्धनासाठी मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)