
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; पाणी बचतीचे आवाहन
अमरावती, 24 जून (हिं.स.) : गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरात तापमानाचा पारा सातत्याने उच्चांक गाठत असून, त्यामुळे पाण्याच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या मागणीमुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा पर्याय विचाराधीन आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरातील पाणीस्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील जलनियोजनाचा अंतिम आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जून महिना संपत आला असतानाही उष्णतेची तीव्रता कायम असल्याने नागरिकांकडून कुलर, घरगुती वापर आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत आहे. परिणामी जलशुद्धीकरण केंद्रातून भरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या काही तासांतच रिकाम्या होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहन धुणे, अंगणात पाणी मारणे किंवा अन्य अनावश्यक कारणांसाठी पाण्याचा वापर टाळण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.
शहराचा प्रमुख जलस्रोत असलेल्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणात सध्या 344 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून, हा साठा पुढील पाच ते सहा वर्षांसाठी पुरेसा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तातडीची पाणीटंचाई नसली तरी भविष्यातील संकट टाळण्यासाठी जलसंवर्धन अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही सतर्कता बाळगली असून, राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. मंगळवारी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमरावती महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आणि जलनियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरातील सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती शासनासमोर सादर केली.
परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास शहरात अधिकृतपणे दोन दिवसांआड पाणीपुरवठा लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य शासनाला देण्यात आल्याचेही समोर आले आहे.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता संजय लेव्हरकर म्हणाले की, आम्ही तीन दिवसांचे पाणी एकाच दिवशी देऊ; मात्र नागरिकांनी ते पाणी पुढील तीन दिवस पुरवून वापरणे आवश्यक आहे. संभाव्य संकट टाळण्यासाठी प्रशासनाने जलनियोजनाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा असे आवाहन त्यांनी केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी