
लंडन , 24 जून (हिं.स.)।पश्चिम युरोपवर निर्माण झालेल्या ‘हीट डोम’मुळे संपूर्ण युरोपीय खंडात भीषण उष्णतेचा तडाखा बसत आहे. ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेनसह अनेक देशांनी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा इशारा दिला असून, तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
ब्रिटनमध्ये बुधवारी इंग्लंडच्या मध्य आणि दक्षिण भागासह वेल्समधील नागरिकांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा सर्वोच्च स्तरावरील इशारा देण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्यानंतर असा इशारा देण्यात आला होता. ब्रिटनच्या हवामान विभागाने दक्षिण इंग्लंडमध्ये तापमान 38 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला असून, जून महिन्यातील हा आतापर्यंतचा उच्चांक ठरू शकतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, या उष्णतेचा परिणाम निरोगी व्यक्तींवरही होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीव्र उष्णतेमुळे इंग्लंडमधील अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या असून, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. समरसेटमधील सुमारे 100 शाळा बुधवार आणि गुरुवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत. बकिंगहॅमशायरमधील जवळपास 100 शाळा अंशतः बंद राहतील, तर ग्लॉस्टरशायरमधील 86 शाळांवर परिणाम झाला आहे.
प्रचंड उष्णतेमुळे रेल्वे रुळ वाकणे आणि ओव्हरहेड वीजतारा सैल होण्यासारख्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी रेल्वेगाड्यांच्या वेगावर निर्बंध घालण्यात आले आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बुधवार आणि गुरुवारी लंडन आणि पॅरिसदरम्यान धावणाऱ्या चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.या उष्णतेचा परिणाम ब्रिटनच्या संसदेपर्यंतही पोहोचला आहे. परंपरागत नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता देत हाऊस ऑफ कॉमन्सच्या प्रेस गॅलरीतील पुरुष पत्रकारांना बुधवारी जॅकेट काढण्याची परवानगी देण्यात आली.
दरम्यान, फ्रान्समध्ये मंगळवारी आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस नोंदवला गेला. वाढत्या तापमानामुळे आयफेल टॉवर आणि लूव्र संग्रहालयातील पर्यटकांसाठी वेळेचे निर्बंध लागू करण्यात आले, तर शाळा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला. फ्रान्सच्या नॅशनल थर्मल इंडिकेटरने 29.8 अंश सेल्सियसचा विक्रमी स्तर गाठला. हा देशातील 30 हवामान केंद्रांच्या सरासरी तापमानावर आधारित निर्देशांक असून, आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर मानला जात आहे.विक्रमी उष्णतेच्या लाटेदरम्यान पश्चिम फ्रान्समधील सुमारे 68 हजार घरांचा वीजपुरवठा बुधवारी खंडित झाला. अधिकाऱ्यांच्या मते, सध्याच्या उष्णतेच्या काळातील ही पहिली मोठी वीजखंडित घटना आहे.
इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी रोम, मिलान, फ्लॉरेन्स आणि ट्युरिनसह 16 शहरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. इटलीमध्ये रेड अलर्ट म्हणजे हवामानाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्याचा परिणाम केवळ वृद्ध आणि आजारी नागरिकांवरच नव्हे, तर निरोगी प्रौढांवरही होऊ शकतो.
पुढील काही दिवसांत ही उष्णतेची लाट पूर्व युरोपमध्येही पसरण्याची शक्यता आहे. पोलंडच्या हवामान विभागाने गुरुवार ते शनिवारदरम्यान देशाच्या पश्चिम भागात तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. तर क्रोएशियामध्ये शुक्रवार आणि शनिवारी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हंगेरी सरकारनेही वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर ‘रेड अलर्ट’ लागू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode