
रायगड, 24 जून (हिं.स.)। श्रीवर्धन तहसील कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतागृहांमध्ये पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा, घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असून नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
श्रीवर्धन तहसील कार्यालय हे तालुक्यातील महत्त्वाचे शासकीय कार्यालय असून दररोज शेकडो नागरिक विविध दाखले, महसुली कामे, निवडणूक विषयक प्रक्रिया तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी येथे येत असतात. मात्र, नागरिकांच्या मूलभूत सुविधांपैकी असलेल्या स्वच्छतागृहांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे स्वच्छतागृह परिसरात स्वच्छता राखा असे फलक लावण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता अधिक गंभीर ठरू शकते. घाणीमुळे डासांची उत्पत्ती, दुर्गंधी तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळणे अपेक्षित असताना त्यांना अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहांची तातडीने साफसफाई करून नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन या गंभीर समस्येची कितपत दखल घेते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)