
मुंबई, 24 जून (हिं.स.) - भारतातील अग्रगण्य एकात्मिक ऊर्जा संक्रमण समूहापैकी एक असलेल्या 'अवादा ग्रुप'ने मुंबईतील जुहू गार्डन आणि लिंक रोडला जोडणाऱ्या मुख्य चौकात 'सोलर इन फुल ब्लूम' या वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक कलाकृतींचे नुकतेच अनावरण करण्यात आले. प्रसिद्ध कलाकार संगीता बबानी यांनी साकारलेल्या या कलाकृतींचे उद्घाटन महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अनुपम खेर मुंबई महापालिका नगरसेविका हेतल गाला, अवादा ग्रुपच्या उपाध्यक्ष सिंदुर मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सौर ऊर्जेच्या नाविन्यपूर्ण क्षमतेवर आधारित असलेले ही कलाकृती स्वच्छ ऊर्जा, शहरी जीवन आणि शाश्वत भविष्यासाठी नागरिकांची सामूहिक जबाबदारी यांचे प्रतीक आहे. पायाभूत सुविधांच्या पलीकडे जाऊन पर्यावरण संवर्धन हा लोकचळवळीचा भाग कसा बनू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
या प्रसंगी आपले मत मांडताना अवादा ग्रुपच्या उपाध्यक्ष सुश्री सिंदुर मित्तल म्हणाल्या की, आमचा असा विश्वास आहे की, शाश्वतता ही केवळ तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांपुरती मर्यादित न राहता आपल्या शहरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेचा भाग बनली पाहिजे. या सार्वजनिक कलाकृती नागरिकांमध्ये निसर्ग, स्वच्छ ऊर्जा आणि आपल्या एकत्रित भविष्याविषयी संवाद सुरू करण्यास मदत करतील. अशा उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढेल आणि समुदायांमध्ये शाश्वततेची भावना अधिक दृढ होईल.
अवादा ग्रुपने यापूर्वी 'अवादा भारत उदय यात्रा' आयोजित करून देशभरात हरित ऊर्जेचा प्रचार केला होता. आता मुंबईच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेली ही कलाकृती केवळ सौंदर्य वाढवणारी नसून, ती प्रत्येक नागरिकाला पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रवृत्त करणारा एक राष्ट्रीय संदेश ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी