
- व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थीहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे, 24 जून (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी हित, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, संशोधन विस्तार आणि पायाभूत सुविधा विकास यांना चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. या निर्णयांमुळे विद्यापीठाच्या सर्वसमावेशक आणि विद्यार्थी-केंद्रित धोरणाला अधिक बळ मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत.
या बैठकीत रशियातील मॉस्को येथील रशियन पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठ (आरयूडीएन), जर्मनीतील बायरॉईथ विद्यापीठ आणि युनायटेड किंग्डममधील ससेक्स विद्यापीठ यांच्याशी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सामंजस्य करारांना मंजुरी देण्यात आली. या करारांमुळे विद्यार्थी व संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व संशोधन संधी उपलब्ध होणार आहेत.
भारतीय ज्ञानपरंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी श्री सदगुरू समूहाच्या सहकार्याने भारतीय भाषा व भारतीय ज्ञान प्रणाली केंद्र तसेच भारतीय जीवनशैली व मूल्य शिक्षण उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली.
तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख शिक्षण देण्यासाठी एड्युलॅब एज्युकेशन एक्स्चेंज प्रा. लि. यांच्या सहकार्याने प्रमाणपत्र व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), पुणे यांच्या सहकार्याने जैवतंत्रज्ञान विभागात एम.एस्सी. (व्हायरॉलॉजी) हा विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अहिल्यानगर उपकेंद्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
सामाजिक समावेशकतेच्या दृष्टीने तृतीयपंथीय विद्यार्थ्यांकडून कोणतेही शैक्षणिक शुल्क आकारले जाणार नाही, यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. हा निर्णय शैक्षणिक समानतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
विद्यापीठाच्या ऐतिहासिक जयकर ग्रंथालयाच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण, तसेच विद्यार्थी अपघात सुरक्षा विमा योजनेचा करार नूतनीकरण करण्यासही मंजुरी देण्यात आली. या योजनांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक सुरक्षा आणि दुर्मिळ शैक्षणिक साधनांचे संरक्षण मिळणार आहे.
याशिवाय विद्यार्थी विकास मंडळाच्या विविध योजना, परीक्षा कामकाजासाठी सीसीटीव्ही खरेदी अर्थसहाय्य, कार्यशाळा आयोजन, इंटर्नशिप व अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम तसेच सौरऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी अर्थसहाय्य यांसारख्या विविध उपक्रमांनाही मंजुरी देण्यात आली.
विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजना अंतर्गत 2026-27 साठी 19 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या सर्व निर्णयांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु