वादळी पावसाने अमरावतीकरांची तारांबळ;जिल्हा सामान्य रुग्णालयात शिरले पाणी
अमरावती, 24 जून (हिं.स.) | शहरात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तब्बल दोन तास कोसळलेल्या पावसाने अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शहरातील अनेक दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरांमध्ये पा
वादळी पावसाने अमरावतीकरांची तारांबळ;जिल्हा सामान्य रुग्णालयात शिरले पाणी


अमरावती, 24 जून (हिं.स.) | शहरात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तब्बल दोन तास कोसळलेल्या पावसाने अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शहरातील अनेक दुकाने, प्रतिष्ठाने तसेच घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. दुसरीकडे, उकाड्याने त्रस्त असलेल्या अमरावतीकरांना या पावसामुळे काहीसा दिलासाही मिळाला.

पावसाचा जोर इतका होता की शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला तर काही भागांमध्ये नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठांमधील व्यावसायिकांची धावपळ उडाली. अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने मालाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथेही पावसाचा फटका बसला. रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात तसेच एक्स-रे विभागात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी पाणी साचल्याने रुग्णालय प्रशासनाला तातडीने उपाययोजना कराव्या लागल्या. मान्सूनपूर्व नालेसफाई आणि पावसाळी तयारीसाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामांवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पहिल्याच जोरदार पावसात शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande