मुंबईत महापौरांच्या पाहणी दरम्यान मनपा अधिकारीच पडला उघड्या मॅनहोलमध्ये
मुंबई, 24 जून (हिं.स.)। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली. मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिरा आलेल्या या मान्सूनने पहिल्याच पावसात मुंबईची द
mumbai rain bmc officer fall into manhole mayor ritu tawde praising infront


मुंबई, 24 जून (हिं.स.)। देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अखेर मान्सूनने दमदार हजेरी लावली. मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिरा आलेल्या या मान्सूनने पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडवली. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले, वाहतूककोंडी निर्माण झाली आणि काही ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर जमीनीवरील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी सकाळी मुंबईच्या महापौर रितु तावडे बाहेर पडल्या असता त्यांच्या समोरच एक धक्कादायक प्रकार घडला. पाहणीदरम्यान एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडली. नंतर ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.

हा प्रकार पाहून महापौर तावडे प्रचंड संतप्त झाल्या. त्यांनी तात्काळ उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारत कडक शब्दांत धारेवर धरले. शहरात जिथे कुठेही मॅनहोल उघडे आढळेल, त्या प्रभागातील जबाबदार अधिकाऱ्याला थेट निलंबित केले जाईल, अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून समाजमाध्यमांवर तो मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तयारीबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, मॅनहोलचे झाकण कचरा काढण्यासाठी काढण्यात आले होते, अशी माहिती महापौरांनी दिली. त्या ठिकाणी इशाऱ्याचा फलक आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी अशा सूचना आणि फलकांकडे लक्ष द्यावे, सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंप बसविण्यात आले असून बीएमसी युद्धपातळीवर काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

दुसरीकडे, मुंबईतील या पहिल्याच पावसामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बीएमसीचा निधी पूर्णपणे संपवला, असा आरोप त्यांनी समाजमाध्यमांवर केला. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वर्षा जलसंचय टाक्या उभारण्यात आल्या नाहीत, असेही त्यांनी म्हटले. मुंबईसारख्या किनारी शहरासाठी पंपिंग स्टेशन आणि निचरा व्यवस्था मोठ्या प्रमाणात सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. हिंदमाता, गांधी मार्केट आणि मिलान सबवे येथे २०२० ते २०२२ दरम्यान उभारलेली यंत्रणा उदाहरण म्हणून दिली जात असताना, आता तीही पूर्ण क्षमतेने चालवली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande