
मुंबई, 24 जून (हिं.स.) - संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आले असून जेष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचे जतन व संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली.
मंत्री, ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे, एकसंघ मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ !
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक त्याचप्रमाणे सर्व सामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम व सक्रीय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म पत्करले. असंख्य जायबंदी झाले. सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदविली गेली! या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणे भाग पडले, आज वयाची साठी पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरी भावी पिढी पर्यंत हा इतिहास पोहचणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे. या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने जेष्ठ पत्रकार कुमार कदम यांचेकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचे शासनाच्या समिती मार्फत परिक्षण व मुल्यांकन करुन हे शासनाने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे.
श्री. कुमार कदम यांनी पदरमोड करुन अतिशय मेहनतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा दुर्मिळ ठेवा आपल्या संग्रही जतन केला होता त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 150 दुर्मिळ छायाचित्रे व त्यामध्ये भाग घेतलेल्या नेते, पत्रकार व कार्यकर्त्यांच्या मुलाखती उपलब्ध आहेत. या मुलाखतींची संख्या 35 एवढी असून त्यांचा कालावधी सुमारे 1 हजार 258 मिनीटे एवढा आहे. तसेच Two women’s Report , मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका सर्व पक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतर पत्रव्यवहार आदी दस्तऐवजाचा समावेश आहे.
या मुलाखतींना अन्यय साधारण महत्त्व आहे. यास्तव, सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयातर्फे कुमार कदम यांचेकडील दूर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज त्यांचा योग्य सन्मान होईल असा मोबदला देऊन शासनाने आपल्या सग्रहाय्य ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कुमार कदम यांनी ही शासनाची विनंती मान्य करुन हा बहुमोल ठेवा शासनाला देण्यास तयारी दाखवल्याबद्दल मंत्री, शेलार यांनी कदम यांचे जाहिर आभार मानले.
सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे संशोधक, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माहितीचे एक नवीन दालन उपलब्ध होणार आहे.
मुलाखतींचा दस्तऐवज
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील लढवय्ये मधू शेट्ये, दिनू रनदिवे, शिरीष पै, श्रीमती. अहिल्या ताई रांगणेकर, बाबा आढाव, भाई वैद्य, शाहीर लिलाधर हेगडे, एन डी पाटील, नारायण आठवले, बाळकृष्ण उर्फ बाळ देशपांडे, कमल भागवत, श्रीमती हौसाबाई भगवानराव पाटील, मालिनी तुळपुळे, मृणाल केशव गोरे, डॉ. बापूसाहेब काळदाते, आचार्य शांताराम गरुड, दत्ताजी ताम्हणे, मोहन धारिया, गणेश प्रभाकर प्रधान, प्रभाकर काशीनाथ कुंटे, नागनाथअण्णा रामचंद्र नायकवडी, कॉम्रेड यशवंत चव्हाण, मधू जोशी, मधुकर पागे, बापूसाहेब पुजारी, बबनराव क्षीरसागर, रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी, गजानन हुद्दार, वसंतराव रंगनाथ होशिंग, अॅड. राम महादेव आपटे, परशुराम नंदिहळ्ळी, कॉ. कृष्णा मेणसे, अशोक याळगी, वसंतराव पाटील, नारायणराव तरळे व शाहीर लीलाधर हेगडे अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी