अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा मोठा दिलासा; ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी
लातूर, 25 जून (हिं.स.) : सहकार मंत्री तथा स्थानिक आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे राज्याच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा मोठा लाभ अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार असून, या निर्णयामुळे ग्रामीण भाग
बाबासाहेब पाटील


लातूर, 25 जून (हिं.स.) : सहकार मंत्री तथा स्थानिक आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे राज्याच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा मोठा लाभ अहमदपूर-चाकूर मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार असून, या निर्णयामुळे ग्रामीण भागात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानसभेत मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळणार आहे. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ (OTS) ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अहमदपूर व चाकूर तालुक्यातील अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाले होते. या योजनेमुळे त्यांच्या कर्जाचा भार कमी होणार असून, पुन्हा बँकांकडून नवीन कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन निधीमुळे खरीप हंगामासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अहमदपूर-चाकूर हा पूर्णतः कृषीप्रधान मतदारसंघ असून, शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी ही योजना कर्जमुक्तीसाठी ‘वरदान’ ठरत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी तालुका स्तरावर विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 31 मार्च 2027 पर्यंत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande