
अमरावती, 25 जून (हिं.स.)। बुधवारी दुपारनंतर अमरावती शहरात झालेल्या धुवांधार पावसाने संपूर्ण शहर अक्षरशः जलमय झाले. अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौक, शासकीय कार्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पाणी निचऱ्याची अपुरी व्यवस्था, बंद पडलेल्या नाल्या आणि नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. आपत्कालीन कक्षाजवळ पाणी साचल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषद कार्यालय परिसरासह अनेक शासकीय इमारतींमध्येही पाणी शिरल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला.
याशिवाय शहरातील अनेक दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. अनेक भागांत रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी वाहनचालकांना वाहन ढकलत नेण्याची वेळ आली, तर नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.
दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारच्या समस्या उद्भवत असतानाही संबंधित यंत्रणांकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि शहर नियोजनाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत असतानाही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसून येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पावसानंतर गुरुवारी विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी बाधित भागांची पाहणी सुरू केली. खासदार बळवंत वानखडे तथा आमदार रवी राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. महापालिका आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही विविध भागांत जाऊन पाहणी करत असल्याचे दिसून आले.
मात्र नागरिकांच्या मते, केवळ पाहणी, दौरे आणि निर्देश देऊन प्रश्न सुटत नाहीत. प्रत्येक वर्षी पावसानंतर अशाच भेटी आणि आढावा बैठका घेतल्या जातात; परंतु प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना आणि जबाबदारी निश्चित होत नसल्याने समस्या कायम राहतात. शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण, आधुनिक जलनिस्सारण व्यवस्था, नियमित नालेसफाई आणि दीर्घकालीन नियोजनाची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
बुधवारच्या पावसाने अमरावतीच्या नागरी व्यवस्थापनासमोरील अनेक त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या आहेत. त्यामुळे आता केवळ पाहणी आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती करून शहराला जलमय होण्यापासून वाचविण्यासाठी ठोस पावले उचलली जातात का, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी