रायगड - जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
रायगड, 25 जून (हिं.स.)। : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्या वतीने दि. ३० जून २०२६ रोजी अलिबाग येथे ‘जागेवर निवड संधी’ (Placement Drive) आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवार
A-golden-job-opportunity-for-u


रायगड, 25 जून (हिं.स.)। : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्या वतीने दि. ३० जून २०२६ रोजी अलिबाग येथे ‘जागेवर निवड संधी’ (Placement Drive) आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी केले आहे.

अलिबाग येथील वैभव निवास, भंडार आळी, चेंढरे येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांमधील विविध रिक्त पदे तसेच अप्रेंटिसशिपसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्या शैक्षणिक माहितीसह प्रोफाइल अद्ययावत करावी. त्यानंतर ‘Pandit Dindayal Upadhyay Job Fair’ या पर्यायातून संबंधित जिल्हा निवडून उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांना विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची माहितीही इच्छुकांना देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०२९ वर संपर्क साधावा. तसेच कार्यालयाचे लिपिक-टंकलेखक श्री. म. भा. वखरे यांच्याशी ९४२१६१३७५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक मार्गदर्शन घेता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande