
लातूर, 25 जून, (हिं.स.)। विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे ही तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे.
मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, ॲक्टिव्ह लिसनिंग, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य अशा महत्त्वाच्या विषयांवर हे प्रशिक्षण आधारित आहे. या कार्यक्रमातून सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक म्हणून विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘अमृत’ आणि ‘एमआयएमएच’ यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेला चालना देणारे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे.
या प्रशिक्षणात पुणे येथे १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण, इंटरॲक्टिव्ह सेशन्स, केस स्टडीज, प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीज आणि तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाईल. त्यानंतर जिल्हास्तरावर शाळा-महाविद्यालयांशी जोडून एक महिन्याचे प्रॅक्टिकल फिल्ड एक्सपोजर दिले जाणार आहे. पुढील ३ ते ५ महिने ऑनलाईन सत्र, केस डिस्कशन, मेंटोरिंग आणि व्यावसायिक मार्गदर्शनाद्वारे सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी केली जाणार आहे.
पात्रता:
एम.ए./एम.एससी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एससी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
प्रशिक्षण मोफत असले तरी निवास, भोजन व राहण्याचा खर्च उमेदवारांना स्वतः करावा लागणार आहे. इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह mahaamrut.org.in� या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
अर्जांची छाननी, ओरिएंटेशन, परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पहिल्या बॅचसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून २०२६ आहे.
मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हा उपक्रम सुवर्णसंधी असल्याचे मत डॉ. कापसे यांनी व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis