
परभणी, 25 जून (हिं.स.)। सन 2021-22 पासून राज्य शासनाकडून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती 'क' प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश इ. सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत. प्रवेशाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. सदर योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजातील असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम प्राधिका-यांने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लक्ष इतकी असावी. सन 2026-2027 या वर्षात नविन विद्यार्थी 1 ली ते 8 वी या इयत्तेत प्रवेशित असावा.परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता निवड झालेल्या रामराव नाईक इंग्लिश स्कूल, मुन्सीराम तांडा (ता. सोनपेठ), कै. मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुन्सीराम तांडा (सायखेडा), जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सोनपेठ), एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल (सेलू), प्रॉस्पेरियस पब्लिक स्कूल (सेलू), हायटेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (एरंडेश्वर झिरो फाटा, ता. पूर्णा), हायटेक माध्यमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय (कारेगाव रोड, परभणी), व्हिजन पब्लिक इंग्लिश स्कूल (विटा रोड, सोनपेठ), हिरकणी सीबीएसई इंग्लिश स्कूल (चोरवड, ता. पालम), गोल्डन ग्लोबल इंग्लिश स्कूल (कोद्री रोड, गंगाखेड), रामरामजी लोहट पब्लिक स्कूल (धर्मापुरी परिसर, पाथरी रोड, परभणी) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय (सीबीएसई), पूर्णा यांचा समावेश आहे. या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी सन 2026-27 मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे अर्ज 06 जुलै, 2026 पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, परभणी यांचे नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत. योजनेचा धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis