भोंसला मिलिटरीच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न
नाशिक, 25 जून (हिं.स.) आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नोकरी व विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आमिष दाखवत ''सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी'' आणि ''भोंसला मिलिटरी स्कूल''च्या नावाचा गैरवापर करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर
भोंसला मिलिटरीच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न


नाशिक, 25 जून (हिं.स.)

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नोकरी व विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आमिष दाखवत 'सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी' आणि 'भोंसला मिलिटरी स्कूल'च्या नावाचा गैरवापर करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संस्थेने संबंधित व्यक्तीविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

प्रीती चव्हाण या नावाने कार्यरत असलेल्या व्यक्तीने 'एसपी लेबर कॉन्ट्रॅक्टर' या फर्मच्या माध्यमातून एक जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये आगामी सिंहस्थ काळात सफाई कामगार, नर्स, आया, वॉर्डबॉय, डॉक्टर, जलपटू, अग्निशामक दल, पार्किंग कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड, ट्रॅफिक पोलीस मदतनीस, आचारी आणि

जीवरक्षक अशा विविध पदांसाठी भरती व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच 'अग्निवीर'चे प्रशिक्षण भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये दिले जाणार असल्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे. मात्र संबंधित व्यक्तीला संस्थेकडून कोणतीही परवानगी अथवा अधिकार देण्यात आलेला नसल्याचे 'सीएचएमई' ने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय कायद्यानुसार कठोर कारवाई करावी; तसेच संस्थेच्या नावाचा होणारा गैरवापर तत्काळ थांबवावा, अशी मागणी संस्थेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. नाशिककरांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता, आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित संस्थेकडून खातरजमा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande