
परभणी, 25 जून (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने हॉटेल चतुर्थी येथे 'मोदी सरकारची 12 वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण' तसेच 25 जून 'काळा दिवस' निमित्त लोकतंत्र सेनानी सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आणीबाणीच्या काळातील संघर्ष आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर आणीबाणी आणि मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावरील विशेष प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी केले. प्रमुख वक्ते मनोज पांगारकर यांनी 1975 च्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर झालेल्या आघाताचा आढावा घेत संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी लोकतंत्र सेनानींनी दिलेल्या संघर्षाची माहिती उपस्थितांना दिली. अभियानाच्या संयोजिका मंगलताई मुदगलकर यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात विविध लोकतंत्र सेनानींचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमास लोकतंत्र सेनानी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis