भारवाडी (जुनी) येथे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांची गैरसोय; तक्रारीनंतर तातडीने दुरुस्ती
अमरावती, 25 जून (हिं.स.) :तिवसा तालुक्यातील भारवाडी (जुनी) येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ते व पुलांच्या कामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी (डायव्हर्शन) रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल
डायव्हर्शन रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भारवाडीकरांचा संताप


अमरावती, 25 जून (हिं.स.) :तिवसा तालुक्यातील भारवाडी (जुनी) येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ते व पुलांच्या कामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी (डायव्हर्शन) रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे आणि दोन पुलांचे काम सुरू असल्याने हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, या रस्त्याची योग्य देखभाल न झाल्याने आणि मुरूम टाकण्याकडे दुर्लक्ष झाल्याने तो पावसामुळे चिखलमय होऊन वाहतुकीस अयोग्य ठरला.

यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्ण, बाजारपेठेत जाणारे नागरिक तसेच दैनंदिन प्रवासी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आरोग्य केंद्र नसल्याने उपचारासाठी बाहेर जाणेही कठीण झाले होते. एका लग्नाची वरातही या रस्त्यावर अडकून पडल्याची माहिती समोर आली.

या प्रकारावर ग्रामस्थ व माजी सरपंच सचिन राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदारांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत रात्रीतून मुरूम टाकून रस्ता दुरुस्त केला.

सकाळपर्यंत रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरळीत करण्यात आला असून अडकलेली वरातही पुढे मार्गस्थ झाली. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पावसाळ्यात अशा समस्या टाळण्यासाठी डायव्हर्शन रस्त्यांची नियमित देखभाल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande