कर्जतमध्ये घरफोडी; परिसरात खळबळ
रायगड, 25 जून (हिं.स.)। : कर्जत शहराजवळील किरवली येथील ज्ञानदीप सोसायटीमधील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा मोठा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्ज
Burglary in Karjat: Stir in the area


रायगड, 25 जून (हिं.स.)। : कर्जत शहराजवळील किरवली येथील ज्ञानदीप सोसायटीमधील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा मोठा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या मालकीच्या श्रद्धा बंगला, प्लॉट क्रमांक १, ज्ञानदीप सोसायटी, किरवली (ता. कर्जत) येथे ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या सेफ्टी डोअर व मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडले. तसेच खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाट फोडून चोरट्यांनी सुमारे ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, देव्हाऱ्यातील पूजेसाठी वापरण्यात येणारी चांदीची भांडी तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही चोरून नेल्याचे समोर आले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ३०५(अ) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वरक करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande