
बीड, 26 जून (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील पाटोदा परिसरामध्ये कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या एका अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला असून दोन गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र अभिमान नागरे हे आपल्या दुचाकीवरून गावी चालले असताना, रोहतवाडी शिवारात तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्याच दिवशी या टोळीने पाटोदा ते बीड रस्त्यावरील थेरला फाटा येथील एका घरातून आणि हॉटेलमधून सुमारे ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, तसेच गोपनीय माहितीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून इंदापूर (जि. पुणे) येथून तिघांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून पाटोदा पोलीस पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis