
रायगड, 25 जून (हिं.स.)। : जलजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती करण्यासाठी रायगड जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबविण्यात येणार आहे. पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी ही माहिती दिली. जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान गावांमधील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी कार्यालये तसेच प्राथमिक शाळांमधील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो, कावीळ यांसारखे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून वापरण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी गावपातळीवर विविध उपक्रम, प्रात्यक्षिके, रॅली, पथनाट्ये आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सहा आठवडे चालणाऱ्या या अभियानात पाणी शुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक, पाणी साठवणुकीची योग्य पद्धत, स्वच्छतेचे महत्त्व, पाणी गळती शोधून दुरुस्ती, पाणी तपासणीविषयक माहिती तसेच सुरक्षित पाणी वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष स्वच्छता उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार कचऱ्याचे वर्गीकरण, घरगुती आणि सार्वजनिक स्वच्छता, पाणी टाक्यांची स्वच्छता, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती आणि पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्रज्ञानाबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक संस्था यांच्या सहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक गावाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद रायगडच्या पाणी व स्वच्छता विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)