
जळगाव, 25 जून (हिं.स.) :भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा (PLI) तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्या कार्यालयात थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मुलाखत दि. 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत भुसावळ येथील अधीक्षक डाकघर कार्यालयात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, मार्केटिंग कौशल्य आणि स्थानिक भागाची माहिती असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार करणारे नागरिक, माजी विमा प्रतिनिधी, विमा सल्लागार, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनाही अर्ज करता येणार आहे.
विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबत अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्याकडे राखीव राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर