
लातूर, २५ जून (हिं.स.) : पुण्यात घर घेण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणावेत तसेच आजी-आजोबांची शेती स्वतःच्या नावावर करून द्यावी, या मागण्यांसाठी एका २० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने पतीवर सिगारेटने चटके देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेचे नाव शिल्पा सतीश तरडे (वय २०) असे असून, ती सध्या जोगलगाव (ता. पालम, जि. परभणी) येथे वास्तव्यास आहे. तिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
माहितीनुसार, शिल्पाचे आई-वडील हयात नसल्याने तिचे पालनपोषण आजी-आजोबा शिवराज पोले व रुक्मिणीबाई पोले यांनी केले. २४ मे २०२१ रोजी तिचा विवाह सतीश देविदास तरडे (रा. थोडगा, ता. अहमदपूर) याच्यासोबत झाला. विवाहानंतर सुरुवातीचे आठ महिने सासरी चांगली वागणूक मिळाल्याचे शिल्पाने फिर्यादीत नमूद केले आहे.
यानंतर पती सतीश हा नोकरीनिमित्त शिल्पाला पुणे जिल्ह्यातील चाकणजवळील खालउमरे येथे घेऊन गेला. पुण्यात गेल्यानंतर अवघ्या एका महिन्यात पतीने आजी-आजोबांची शेती स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी आणि पुण्यात घर घेण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली. मागणी पूर्ण न झाल्याने दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ आणि उपाशी ठेवण्याचा प्रकार सुरू झाल्याचा आरोप शिल्पाने केला आहे.
दरम्यान, दाम्पत्याला एक मुलगीही झाली. मात्र, ऑक्टोबर २०२५ मध्ये छळाची पराकाष्ठा झाली. पतीने शिल्पाच्या हातावर आणि शरीरावर पेटत्या सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्रास असह्य झाल्याने शिल्पाने तिच्या मामाला बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत परभणी येथे आजी-आजोबांकडे आश्रय घेतला.
यानंतर ८ मे २०२६ रोजी शिल्पाने महिला व बालसाहाय्यता कक्ष, अहमदपूर समुपदेशन केंद्र येथे तक्रार दाखल केली. मात्र, पती आणि सासरच्या मंडळींनी समुपदेशनासाठी हजेरी लावली नाही. उलट “तुला काय करायचे ते करून घे,” अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
समुपदेशन केंद्राने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे २२ जून २०२६ रोजी अहमदपूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. यानुसार पोलिसांनी सतीश देविदास तरडे, इंदरबाई देविदास तरडे (सासू), भाग्यश्री नागेश भजनर (नणंद) आणि नागेश भजनर (नंदवाई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
अहमदपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वैजनाथ भीमराव दिंडगे करीत आहेत.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis