
रायगड, 25 जून (हिं.स.) : म्हसळा तालुक्यातील ढोरजे नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहते आणि त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असतानाही पुलाच्या उंचीवाढीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ढोरजे पुलाची उंची नेमकी कधी वाढविणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला केला आहे.
मौजे ढोरजे येथील हा पूल सुमारे २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून त्याची उंची अपुरी असल्याने मुसळधार पावसात पुलावरून पाणी वाहू लागते. परिणामी कुडतुडी, ढोरजे, गौवळवाडी, कानसेवाडी आणि देवघर कोंड या गावांचा संपर्क तुटतो. तसेच हा मार्ग तळा तालुक्यालाही जोडत असल्याने अनेक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांना जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे २० फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामस्थांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली होती. त्यावेळी मंत्री तटकरे यांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणीही केली होती. मात्र त्यानंतर एक वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दोन वर्षांपूर्वी याच पुलावरून पाणी वाहत असताना एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेताना उशीर झाल्यामुळे देवघर कोंड मार्गावरच तिची प्रसूती झाल्याची घटना घडली होती. तसेच पुलावरील संरक्षण कठडेही तुटलेल्या अवस्थेत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर ढोरजे पुलाची उंची तातडीने वाढवून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः लक्ष घालून या प्रश्नावर त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)