
अमरावती, 25 जून (हिं.स.)। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित भव्य जाहीर पक्षप्रवेश व पदग्रहण सोहळा अभियंता भवन, शेगाव नाका चौक येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात काँग्रेसचे धडाकेबाज नेते प्रकाश साबळे यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह विविध पक्षांतील सुमारे 150 हून अधिक कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश करून आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
यावेळी आमदार रवि राणा यांच्या हस्ते नवप्रवेशितांचे पक्षाचा दुपट्टा परिधान करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी व जल्लोषात हा सोहळा पार पडला. प्रकाश साबळे यांचा काँग्रेसमध्ये स्वाभिमान दुखावला गेल्याने त्यांनी युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, “प्रकाश साबळे यांच्यासारखे जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोडणारे आणि समाजसेवेसाठी झटणारे कार्यकर्ते पक्षाची खरी ताकद आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल.” तर प्रकाश साबळे यांनी, “आमदार रवि राणा यांच्या जनहिताच्या कार्याने प्रेरित होऊन मी पक्षात प्रवेश केला असून युवा स्वाभिमान पार्टी सामान्य कार्यकर्त्यांना सन्मान व न्याय देणारी संघटना आहे,” असे सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना रवि राणा यांनी भाजप हा आमचा मोठा भाऊ असून युवा स्वाभिमान पार्टी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वासोबत ठामपणे उभी असल्याचे सांगितले. तसेच विधान परिषद निवडणुकीतील कामगिरीवरून काँग्रेसवरही त्यांनी टीका केली.या सोहळ्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. प्रकाश साबळे यांची जिल्हाध्यक्ष, सोनाली नवले यांची महिला जिल्हाध्यक्षा, संजय भारसाकडे यांची दर्यापूर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील अनेक पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, सागर देशमुख महाराज, सुनिल राणा, जयंत वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, कमलकिशोर मालानी यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. युवा स्वाभिमान पार्टी आगामी निवडणुकांमध्ये अधिक ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी