
चार घरांचे नुकसान, वीज पडून एका गायीचा मृत्यू तीन मंडळांत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यात मान्सूनचा जोरदार धडाका
अमरावती, 25 जून (हिं.स.)।
जिल्ह्यात मान्सूननेदमदार आगमन करत मंगळवार, २३ जून आणि बुधवार २४ जून रोजी सायंकाळी जोरदार मुसळधार पावसाची हजेरी लावली. जिल्ह्यात १० महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून चार घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय विज पडून एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना चिखलदरा तालुक्यात घडली. तीन महसूल मंडळांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे.जिल्ह्यात सरासरी ३९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. धारणीत १२९ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय नांदगाव खंडेश्वर येथे ११८.५ मिमी, मंगरुळ ११३.२५ मिमी, शिवनी येथे ९९.२५ मिमी, माहूली येथे ९५ मिमी, अमरावती येथे ७२.५ मिमी तर बडनेरा येथे ६८.७५ मिमी पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे धारणी व भातकुली तालुक्यात एकूण चार घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. धारणी तालुक्यात एका तर भातकुली तालुक्यात तीन घरांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. तसेच चिखलदरा तालुक्यात वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने या पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी अथवा मानवी जखमीची घटना घडलेली नाही. तसेच शेतीपिकांचे नुकसान झाल्याची नोंद अद्याप प्राप्त असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी