
बीड, 25 जून (हिं.स.)।
टाकळी-कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.
विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना
दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी पंकजा मुंडेंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी परिवाराच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याच्या पत्नीला पाच लाखाची मदत देणार असून मी स्वतः डॉ. प्रितम मुंडे यांना चेक घेऊन तिथे पाठविणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis