
स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
रायगड, 25 जून (हिं.स.) : कल्याण (वालधुनी) येथील बुद्धभूमीच्या सुमारे 30 एकर जागेवर बोधगया येथील महाबोधी मंदिराच्या धर्तीवर भव्य ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यालाही मान्यता देण्यात आली असून, या निर्णयाची माहिती पावसाळी अधिवेशनात विधानसभेत देण्यात आली.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शासन या प्रकल्पासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे कल्याण शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
या घोषणेमुळे बौद्ध समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याची चर्चा सुरू आहे. जागेच्या मालकी हक्क, हस्तांतरण प्रक्रिया आणि विकास आराखड्यातील सहभाग यासंदर्भातील मुद्द्यांवर ठोस निर्णय अपेक्षित असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे.
दरम्यान, विकास प्राधिकरणात बुद्धभूमी फाउंडेशनचा सहभाग तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून लेखी निर्णय कधी घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फाउंडेशनचे आंदोलन सुरूच असून प्रलंबित मागण्यांबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)