
समर्थ क्रांती फाउंडेशनकडून औषध व्यवसायातील समस्यांबाबत घेतली भेट
नाशिक, 25 जून (हिं.स.)।
: औषध विक्री व्यवस्था, फार्मासिस्टांचे प्रश्न, औषध विक्रेते आणि रुग्णांच्या हिताशी निगडित विविध मागण्यांसाठी समर्थ क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेतली. यावेळी औषध वितरण व्यवस्थेतील अडचणी आणि सुधारणा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.फाउंडेशनच्या वतीने औषध व्यवसायातील काही अनियमित बाबी, नियमांचे उल्लंघन, परवानगी नसलेल्या व्यक्तींकडून औषधांचा वापर, विशिष्ट औषध दुकानांना प्राधान्य देणाऱ्या प्रिस्क्रिप्शन पद्धती, कालबाह्य (एक्स्पायरी) औषधांच्या परताव्याच्या समस्या, ऑनलाइन औषध विक्रीतील त्रुटी तसेच डॉक्टरांच्या अवाचनीय प्रिस्क्रिप्शनमुळे निर्माण होणाऱ्या रुग्ण सुरक्षेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.यावेळी आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे समजून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. औषध क्षेत्रात पारदर्शकता राखणे, नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.औषध वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी फाउंडेशनकडून करण्यात आली.यावेळी समर्थ क्रांती फाउंडेशनचे संस्थापक धनंजय खाडगीर, अध्यक्ष सुनीता माळोदे, उपाध्यक्ष विजय गायखे, सचिव शिवाजी कडभाने, उमेश येवले, अश्विनी खकाळे आणि वैशाली सोनवणे उपस्थित होते.
तक्रारींसोबत ठोस पुरावे द्या
औषध व्यवसायातील गैरप्रकारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे संबंधित पुरावे, कागदपत्रे आणि ठोस माहिती सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त तक्रारी संबंधित विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असल्यास त्यावर नियमानुसार कारवाई करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले.फार्मासिस्ट, औषध विक्रेते आणि रुग्णांच्या हिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे समर्थ क्रांती फाउंडेशनने स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV