रोटेगाव येथे ओएचई देखभालीसाठी टॉवर कार शेड कार्यान्वित; रेल्वे सेवेच्या दुरुस्तीस गती मिळणार
परभणी, 25 जून (हिं.स.) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई ) देखभाल व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत रोटेगाव यार्ड येथे समर्पित टॉवर कार सायडिंग व टॉवर कार शेड कार्यान्वित करण्यात आले आहे. य
रोटेगाव येथे टॉवर कार सायडिंग व शेडचे लोकार्पण नांदेड विभागाच्या OHE देखभाल व्यवस्थेला मिळाले नवे बळ


परभणी, 25 जून (हिं.स.) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई ) देखभाल व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत रोटेगाव यार्ड येथे समर्पित टॉवर कार सायडिंग व टॉवर कार शेड कार्यान्वित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे ओएचई यंत्रणेच्या देखभाल व आपत्कालीन दुरुस्ती कामांना अधिक गती मिळणार आहे.

नांदेड विभागातील नव्याने स्थापन झालेल्या ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन (टीआरडी) विभागाला अलीकडेच सहा टॉवर कार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या टॉवर कारच्या सहाय्याने ओएचई यंत्रणेची नियमित तपासणी, दैनंदिन देखभाल तसेच बिघाडांवरील तातडीची दुरुस्ती आणि आपत्कालीन पुनर्स्थापना कार्य अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

या टॉवर कारचा कार्यक्षम वापर व्हावा आणि 24 तास तत्पर सेवा उपलब्ध राहावी यासाठी रोटेगाव येथे स्वतंत्र सायडिंग व शेडची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे टॉवर कार सुरक्षितपणे उभ्या ठेवण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत त्यांना त्वरित घटनास्थळी रवाना करणे शक्य होणार आहे.

अंकाई–मुदखेड मुख्य रेल्वेमार्गावरील ही पहिलीच टॉवर कार सायडिंग व शेड सुविधा असून, नांदेड विभागाच्या ओएचई पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सुविधेमुळे ओएचई बिघाडांवरील प्रतिसादाचा वेळ कमी होऊन सेवा पूर्ववत करण्याचा कालावधी घटणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या मते, या नव्या सुविधेमुळे रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढणार असून भारतीय रेल्वेच्या दर्जेदार सेवांना अधिक बळ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande