
लातूर, 25 जून (हिं.स.)अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी प्रतिबंधक कारवाई करत चार गुन्हेगारांना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. लातूर पोलीस अंतर्गत गांधी चौक पोलीस ठाणे यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच दहशत निर्माण करणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सखोल चौकशीनंतर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी रोहिणी न-हे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६(१)(ब) अंतर्गत हद्दपारीचे आदेश पारित केले.
या कारवाईत महादेव सन्मुखराव आणि महेश कांबळे यांना लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यातील काही भागांतून हद्दपार करण्यात आले. तर रेहान कुरेशी आणि पृथ्वीराज माने यांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
आरोपींविरुद्ध मारहाण, धमकी, दहशत निर्माण करणे आणि सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचविण्यासारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. आदेशानुसार संबंधित आरोपींना २४ तासांत निर्धारित क्षेत्र सोडणे बंधनकारक असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
लातूर पोलिसांकडून भविष्यातही अशा सराईत गुन्हेगारांवर अधिक तीव्र कारवाया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis