
परभणी, 25 जून (हिं.स.)।
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित परभणी दौर्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि दौर्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 26 जून रोजी जिल्ह्यात चार ठिकाणी पदाधिकार्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. शिवसेना संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका होणार आहेत. यावेळी पाथरी विधानसभा प्रमुख कल्याणराव रेंगे पाटील आणि जिंतूर विधानसभा प्रमुख रामनाना खराबे पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार मानवत येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजता, पाथरी-सोनपेठ विभागाची बैठक दुपारी 12 वाजता पाथरी येथील शासकीय विश्रामगृहात, सेलू येथील बैठक दुपारी 2 वाजता विधानसभा प्रमुख राम पाटील यांच्या संपर्क कार्यालयात, तर जिंतूर येथील बैठक दुपारी 4 वाजता शहरप्रमुख अरविंद कटारे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकींना शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे विधानसभा प्रमुख, सहसंपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौर्याचे नियोजन, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी राजकीय रणनीती यासंदर्भात या बैठकींमध्ये सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी दिली. त्यांनी सर्व संबंधित पदाधिकार्यांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis