मुसळधार पावसानंतर अमरावती मनपाची तात्काळ धाव; आयुक्त व महापौरांनी केली प्रत्यक्ष पाहणी
अमरावती, 25 जून (हिं.स.)। बुधवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताच अमरावती महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करत नागरिकांना दिलासा दिला. महापालिका आयुक्त वर्षा लड्डा आणि महापौर
मुसळधार पावसानंतर मनपाची तात्काळ धाव; आयुक्त व महापौरांनी केली प्रत्यक्ष पाहणी


अमरावती, 25 जून (हिं.स.)।

बुधवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होताच अमरावती महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करत नागरिकांना दिलासा दिला. महापालिका आयुक्त वर्षा लड्डा आणि महापौर श्रीचंद तेजवानी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली व संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

महानगरपालिकेच्या स्वच्छता, अग्निशमन आणि इतर विभागांनी समन्वय साधून पाणी उपसा व निचऱ्याची कामे वेगाने सुरू केली. चौधरी चौक परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारीनंतर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त वर्षा लड्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पंजाबराव तायवाडे उपस्थित होते.गांधी चौकातील दत्त पॅलेस व अग्रवाल प्लाझा परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारींनंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते कामांदरम्यान पुरेशी जलनिस्सारण व्यवस्था करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित यंत्रणेला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी सभापती स्वाती कुलकर्णी, नगरसेवक मिलिंद बांबल, नगरसेविका लविना हर्षे, चंद्रशेखर कुलकर्णी व विशाल कुलकर्णी उपस्थित होते.

यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय परिसराची पाहणी करण्यात आली. रिटर्न पाण्यामुळे परिसरात साचलेल्या पाण्याचा अग्निशमन विभागाने आपत्कालीन पंपाच्या साहाय्याने तातडीने उपसा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अमरावती महानगरपालिका पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णतः सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande