
नाशिक, 25 जून (हिं.स.)।
: पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गो सेवा आयोगातर्फे राज्यमाता गोसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज नाशिक शहरात होती. या यात्रेचे नागरिकांनी स्वागत केले. दुपारनंतर गोमाता संवाद यात्रा ठाणे जिल्ह्याकडे रवाना झाली.
यानिमित्त शहरातील गुरू दक्षिणा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार दिलीप बनकर अध्यक्षस्थानी होते. गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सदस्य सचिव डॉ. श्यामकांत पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. बाबूराव नरवडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोशाळा चालकांचा सत्कार करण्यात आला.
आमदार श्री. बनकर म्हणाले की, गोमाता संवाद यात्रा उपक्रम अतिशय चांगला आहे. गोशाळासाठी राज्य शासन मदत करीत आहे. गोशाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आयोगाचे अध्यक्ष श्री. मुंदडा म्हणाले की, गोमातेचे महत्व सर्वत्र आहे. ग्रामीण भागात पूर्वी पहिली भाकरी गायीचा नैवेद्य म्हणून काढली जात असे. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान देण्यात येते. गोसंवर्धन ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने सहकार्य करणे आवश्यक आहे. गोमाता संवर्धन ही लोकचळवळ करावयची आहे. गायींचा सांभाळ करणे शक्य नसेल, तर अशा गायी गोशाळेला द्याव्यात. त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल. गोमाता संवाद यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहआयुक्त डॉ. नरवाडे म्हणाले की, पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याचे पशुसंवर्धन विभाग बळकटीकरण करीत आहे. गोशाळा माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यातून देशी जातीच्या गायींचे संवर्धन केले जात आहे. आयोगाचे सचिव डॉ. पाटील म्हणाले की, गोशाळांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेत गोशाळा यांनी सक्षम व्हावे. अनुदान वितरणाची कार्यवाही लवकरच करण्यात येईल. त्याचा वापर चारा निर्मितीसाठी केला पाहिजे. त्यासाठी भरीव कामगिरी बजावली पाहिजे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येईल. गोशाळा संवर्धनासाठी सामाजिक दायित्व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी सुनील बच्छाव, सुनील सूर्यवंशी, भाऊराव निकम, रमेश मानकर, प्रदीप बच्छाव, शिवानंदगिरी महाराज, सरस्वती महाराज, सुनील बच्छाव, जनेश्वरानंद महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV