नसरापूर प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी – आमदार डॉ. नीलम गोऱ्हे
बालिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची गरज मुंबई, 25 जून (हिं.स.) : नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले असून २९ जून रोजी अंतिम निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ने
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


बालिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची गरज

मुंबई, 25 जून (हिं.स.) : नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले असून २९ जून रोजी अंतिम निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या व विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अतिशय लहान मुलीवर तिच्या भोळेपणाचा फायदा घेत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील साक्षीपुरावे अल्पावधीत न्यायालयासमोर मांडले गेले असून न्यायालय पुरावे आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय देईल, याबाबत विश्वास आहे. मात्र कोपर्डीसह अन्य गंभीर बलात्कार आणि हत्या प्रकरणांमध्ये ज्या प्रकारे कठोर शिक्षा देण्यात आली, त्याच धर्तीवर या प्रकरणातही फाशीची शिक्षा व्हावी, अशी समाजाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपी वृद्ध आहे किंवा त्याचे वय जास्त आहे, या कारणांमुळे कोणतीही सहानुभूती दाखवू नये. अशा अट्टल गुन्हेगारांविरोधात कठोर संदेश जाणे आवश्यक आहे. चिमुकल्या मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि समाजात धाक निर्माण करण्यासाठी न्यायालयाने कठोर भूमिका घ्यावी, असे त्या म्हणाल्या.

अलीकडच्या काळात पुणे, कल्याण आणि इतर भागांत अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी अशा गुन्हेगारांची स्वतंत्र नोंद ठेवून पोलिसांनी प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी केली.

डॉ. गोऱ्हे यांनी पाळणाघरे आणि बालसंगोपन केंद्रांसाठी कठोर आचारसंहिता लागू करण्याची गरजही अधोरेखित केली. बालकांची काळजी घेणारे कर्मचारी प्रशिक्षित असावेत, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा असावी आणि पालकांना मुलांशी कसे वागले जाते याची माहिती मिळावी, यासाठी ठोस नियमांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि डिजिटल माध्यमांवरील हिंसक आशयाचा परिणाम याचाही अभ्यास करून राज्य शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. नसरापूर प्रकरणातील अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर संदेश जावा, हीच समाजाची अपेक्षा असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande