
गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया मोफत केल्याने बच्छाव कुटुंबियांसाठी डॉ.शरद पाटील ठरले देवदूत
नाशिक, 25 जून (हिं.स.)। सुशील आय केअर संचालित अग्रवाल आय हॉस्पिटल येथे कृत्रिम डोळा (बोस्टन के-प्रो) प्रत्यारोपणाद्वारे एका महिला रुग्णेला पुन्हा दृष्टी मिळवून देण्यात यश आले आहे. ही अत्याधुनिक आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. शरद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
सुवर्णा बच्छाव (वय ३०) या बालवयापासून ‘झेरोडर्मा पिगमेंटोसम’ या दुर्मिळ आजाराने ग्रस्त होत्या. या आजारामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यांवरील बुबुळांवर पांढरे आवरण आले होते आणि त्यांची दृष्टी जवळपास नष्ट झाली होती. अनेक ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित यश मिळाले नव्हते. आर्थिक परिस्थितीही प्रतिकूल असल्याने उपचारांचा खर्च पेलणे कठीण झाले होते.डॉ. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ ते २०२६ या कालावधीत सुवर्णा यांच्या दोन्ही डोळ्यांवर मूळपेशी प्रत्यारोपण, बुबुळ प्रत्यारोपण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच १३ मे २०२६ रोजी डाव्या डोळ्यात बोस्टन के-प्रो कृत्रिम बुबुळ प्रत्यारोपण अशा अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपचारांमुळे त्यांना पुन्हा दृष्टी मिळाली.बच्छाव कुटुंबीयांनी डॉ. शरद पाटील आणि सुशील आय हॉस्पिटलचे आभार मानताना, “अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीचे उपचार कमी खर्चात करून आमच्या आयुष्यात प्रकाश आणला. डॉ. पाटील आमच्यासाठी देवदूत ठरले,” अशा भावना व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV