तीर्थक्षेत्र माहूर अंधारात ; भाविकांची फरफट
नांदेड, 25 जून (हिं.स.)। राज्यभरातून लाखो भाविक श्रद्धेने येणाऱ्या तीर्थक्षेत्र माहूरमध्ये विजेचा सुरू असलेला लपंडाव आता असह्य बनला आहे. थोडासा वारा सुटला किंवा पावसाची एखादी सर आली की, संपूर्ण माहूरची बत्ती गुल होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळ
तीर्थक्षेत्र माहूर अंधारात ; भाविकांची फरफट


नांदेड, 25 जून (हिं.स.)।

राज्यभरातून लाखो भाविक श्रद्धेने येणाऱ्या तीर्थक्षेत्र माहूरमध्ये विजेचा सुरू असलेला लपंडाव आता असह्य बनला आहे. थोडासा वारा सुटला किंवा पावसाची एखादी सर आली की, संपूर्ण माहूरची बत्ती गुल होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अख्खा उन्हाळाभर महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना वेठीस धरल्याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. दिवस-रात्र होणाऱ्या भारनियमनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तीर्थक्षेत्राची प्रतिमाही मलिन होत आहे.

महावितरण, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांचा आणि भाविकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकीकडे तीर्थक्षेत्र विकासाच्या मोठमोठया घोषणा केल्या जातात, कोट्यवधी रुपयांच्या निधीची चर्चा होते, तर दुसरीकडे भाविकांना अखंड वीजपुरवठ्याची सुविधा मिळत नाही, ही वस्तुस्थिती लाजिरवाणी आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माहूरमध्ये अशी परिस्थिती असेल तर दुर्गम भागातील नागरिकांची अवस्था काय असेल? असा सवाल उपस्थित होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande