
कराकास, 25 जून (हिं.स.)।व्हेनेझुएलामध्ये बुधवारी सायंकाळी सलग आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी मोठी हानी घडवून आणली. पहिला भूकंप ७.२ तर दुसरा ७.५ तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे राजधानी कराकासमध्ये अनेक इमारती कोसळल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन बेटांसाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. सरकारने नागरिकांना मोकळ्या जागेत राहण्याचे आणि मदत व बचावकार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.या भूकंपात आतापर्यंत १६४ जण मरण पावले असून ९७१ जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याने किंवा दबल्याने १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, पहिला भूकंप रिश्टर स्केलवर ७.२ तीव्रतेचा होता. त्याचे केंद्र व्हेनेझुएलाच्या कॅरिबियन किनारपट्टीवरील मोरोन शहराच्या पश्चिमेस आणि कराकासपासून सुमारे १६८ किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपाची खोली १३ किलोमीटर नोंदवण्यात आली. पहिल्या धक्क्यानंतर काही मिनिटांतच ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि अधिक शक्तिशाली भूकंप झाला. त्याची खोली १० किलोमीटर होती. त्याचे केंद्र मोरोन शहराच्या नैऋत्येस १६ किलोमीटर अंतरावर होते.या भूकंपानंतर अमेरिकेच्या पॅसिफिक सुनामी चेतावणी केंद्राने प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन बेटांसाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे.
व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डिओसदादो काबेलो यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवले. कराकासमधील अल्तामीरा परिसरात घरे आणि इमारती कोसळल्याच्या चिंताजनक घटना घडल्या आहेत.काबेलो यांनी नागरिकांना सध्या मोकळ्या जागेतच राहण्याचे आवाहन केले आहे. भूकंपानंतरचे धक्के (आफ्टरशॉक्स) बसण्याची शक्यता असल्याने आधीच नुकसान झालेल्या इमारतींना आणखी धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. या भूकंपात काही लोक जखमी झाल्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच वाहनचालकांनी रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग मिळावा यासाठी रस्ते मोकळे ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारी दूरचित्रवाणीवर बोलताना काबेलो म्हणाले, “काही नागरिक घाबरलेले असतील, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, निश्चित आपत्कालीन प्रक्रियेनुसार मदत व बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून सर्वाधिक गरज असलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवता येईल.”ते पुढे म्हणाले, “लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या. एकमेकांशी संपर्क साधा आणि कोणी जखमी किंवा प्रभावित झालेले नाही याची खात्री करा.”
दरम्यान, कराकासमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसताच अनेक इमारती हादरल्या आणि नागरिक तातडीने बाहेर पडले. अनेक जण रस्त्यांवर उभे राहून नुकसानग्रस्त इमारतींकडे पाहत होते. काही ठिकाणी संपूर्ण भिंती कोसळल्याने घरांतील आणि कार्यालयांतील फर्निचर रस्त्यावरूनच दिसत होते.राजधानीतील दोन भागांमध्ये धुळीचे मोठे लोटही उसळल्याचे दिसून आले.व्हेनेझुएलाच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेले मायकेटिया आंतरराष्ट्रीय विमानतळ भूकंपामुळे झालेल्या गंभीर नुकसानीमुळे बंद करण्यात आले आहे.कराकासच्या बाहेरील भागात असलेल्या मायकेटिया आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळल्याने विमानतळ तातडीने बंद करण्यात आला आहे. भूकंपामुळे विमानतळाच्या संरचनेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिगेझ यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून देशवासियांना संबोधित करताना सांगितले की, रेल्वे आणि मेट्रो सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. तसेच, आठवड्याच्या उर्वरित दिवसांसाठी शाळा आणि महाविद्यालयांतील वर्गही स्थगित करण्यात आले आहेत. डेल्सी रोड्रिगेझ यांनी बुधवारी देशात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या, “ज्या कुटुंबांनी या दुर्दैवी आपत्तीत आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि त्यांच्याप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.”मात्र, त्यांनी मृतांचा किंवा जखमींचा एकूण आकडा जाहीर केलेला नाही. या भीषण आपत्तीनंतर अमेरिकेसह अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode