मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीकॉम पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणार - मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, 25 जून (हिं.स.) : मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची सूचना विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदेत प्र
मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीकॉम पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणार - मंत्री चंद्रकांतदादा पाटील


मुंबई, 25 जून (हिं.स.)

: मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची सूचना विद्यापीठाच्या कुलगुरूंना केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिल परब यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विद्यापीठातील परीक्षातील गैरप्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषींवर नियमानुसार प्रशासकीय व शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. त्यानुसार गैरप्रकारात सहभागी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. दोषी विद्यार्थ्यांवरही कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

तसेच अवैध साधन समितीच्या निर्णयानुसार संबंधित दोषी विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करण्यात आला असून, त्यांना पुढील दोन विद्यापीठ परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय नियमानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande