सागावजवळ एसटी बसचा अपघात; 52 प्रवासी सुखरूप
रायगड, 25 जून (हिं.स.) :लोणावळ्याकडून अलिबागकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा गुरुवारी सकाळी सागावजवळील मोरीजवळ अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक रेलिंगला धडकून चिखलात रुतली.सुदैवाने या अपघा
ST bus accident brings safety issue to the forefront.


रायगड, 25 जून (हिं.स.) :लोणावळ्याकडून अलिबागकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा गुरुवारी सकाळी सागावजवळील मोरीजवळ अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक रेलिंगला धडकून चिखलात रुतली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे नुकसान झाले असून प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण आगाराची बस (एमएच-20 बीएल-3691) पहाटे साडेपाच वाजता लोणावळ्याकडे रवाना झाली होती. त्यानंतर सकाळी सव्वा सातच्या सुमारास ती लोणावळ्यातून अलिबागच्या दिशेने निघाली. पेणमार्गे अलिबागकडे येत असताना सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सागाव बसस्थानकाजवळ मोरीजवळ हा अपघात घडला.

बस अचानक रस्त्याबाहेर जाऊन रेलिंगला धडकल्याने ती चिखलात अडकली. या बसमध्ये एकूण 52 प्रवासी प्रवास करत होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली, मात्र सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतर स्थानिक नागरिक व यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि बस सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.

दरम्यान, वारंवार घडणाऱ्या एसटी अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून चालकांचे प्रशिक्षण, वाहनांची तांत्रिक तपासणी आणि रस्ते सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande