राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक, कलाकार मानधन सन्मान योजनेची अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून
रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । राज्य शासनातर्फे १९५४-५५ पासून राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या १ जुलै पासून सुरू होत आहे. संपूर्णपणे कला आणि साहित्य क्षेत्रावर आ
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक, कलाकार मानधन सन्मान योजनेची अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून


रत्नागिरी, 25 जून (हिं.स.) । राज्य शासनातर्फे १९५४-५५ पासून राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या १ जुलै पासून सुरू होत आहे.

संपूर्णपणे कला आणि साहित्य क्षेत्रावर आपली उपजीविका अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील साहित्यिक व कलावंतांना या योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत दरमहा ५,००० रुपये मानधन दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुकांनी 'आपले सरकार' पोर्टलच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव कलाकार मानधन निवड समिती तथा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कलाकार किंवा साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. त्याचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे, तर दिव्यांग कलाकारांसाठी वयाची अट १० वर्षांनी शिथिल करण्यात आली असून त्यांच्यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे निश्चित केली आहे. संबंधित कलाकाराचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असावे आणि त्यांनी या क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातलेली असावी. कलाकाराचे सर्व मार्गांनी मिळून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्यांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे किंवा जे आधी कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही, असे कलाकार यासाठी पात्र ठरतील. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे अथवा इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे कलाकार या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. निवड प्रक्रियेत वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

संकेतस्थळावर अर्ज सादर करताना काही आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यामध्ये वयाचा दाखला, ओळख व पत्त्याच्या पुराव्यासाठी ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड असलेला बँक तपशील आणि लागू असल्यास पती व पत्नीचा एकत्रित फोटो जोडणे गरजेचे आहे. याशिवाय दिव्यांग असल्यास अपंगत्वाचा दाखला, राज्य किंवा केंद्र सरकारचे पुरस्कार मिळाले असल्यास त्याचे प्रमाणपत्र, नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र आणि इतर विविध पुरावे अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र साहित्यिक व कलावंतांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande