सोलापूर - स्मारक कामाच्या संथगतीविरोधात शरणू हांडे आक्रमक; कुलगुरूंसमोरच अनोखे आंदोलन
सोलापूर, 25 जून (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून बुधवारी स्मारक समितीच्या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. स्मारक समितीचे
Univerisity Solapur


सोलापूर, 25 जून (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून बुधवारी स्मारक समितीच्या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. स्मारक समितीचे सदस्य शरणू हांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शाखा अभियंता आणि कंत्राटदार यांच्या अंगावर भंडारा उधळून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या स्मारक समितीच्या बैठकीत स्मारकाच्या कामाच्या विलंबाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. शासनाकडून निधी मंजूर होऊनही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्मारकाचे काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप हांडे यांनी केला.

प्रत्येक बैठकीत अधिकारी आणि कंत्राटदारांकडून ‘दहा दिवसांत काम पूर्ण करू’, ‘एका महिन्यात काम मार्गी लावू’ अशी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कामाची गती वाढत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

याच संतापातून बैठकीदरम्यान हांडे यांनी पीडब्ल्यूडी अधिकारी, शाखा अभियंता आणि कंत्राटदार यांच्या अंगावर भंडारा उधळला. या घटनेमुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार यांच्यावर मात्र भंडारा उधळण्यात आला नाही.

घटनेनंतर प्रतिक्रिया देताना शरणू हांडे म्हणाले, “अहिल्यादेवी स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना जेजुरीच्या खंडेरायाने सुबुद्धी द्यावी, या भावनेतून मी भंडारा उधळला.”

कुलगुरूंच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली असून, स्मारकाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande