
सलग २६ वर्षांची अन्नसेवा; बाजार समितीचा सामाजिक उपक्रम कायम
लातूर, 25 जून (हिं.स.)।
लातूर बाजार समितीला राज्यात मानाचे स्थान मिळवून देण्यात बाजार समितीतील व्यापारी, आडते आणि विविध घटकांचा सिंहाचा वाटा आहे. व्यापारासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यातही हे घटक अग्रेसर असून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा जोपासत आहेत.
याच सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या चाकरवाडी येथे होणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहासाठी गेल्या सलग २६ वर्षांपासून धान्याचा ट्रक पाठविण्यात येत आहे. यंदाही २७ व्या वर्षी हा धान्याचा ट्रक माजी आमदार वैजनाथ शिंदे आणि सभापती जगदीश बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकरवाडीकडे रवाना करण्यात आला.
लातूर बाजार समितीतील विविध घटकांच्या सहकार्याने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. अखंड हरीनाम सप्ताहात होणाऱ्या अन्नसेवेसाठी या धान्याचा मोठा उपयोग होत असून भाविकांना भोजनसेवा पुरविण्यात या उपक्रमाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
धान्याचा ट्रक रवाना करण्यापूर्वी माजी आमदार वैजनाथ शिंदे, सभापती जगदीश बावणे, व्यापारी अशोक अग्रवाल, बालाप्रसाद बिदादा, संचालक अनिल पाटील, युवराज जाधव, अनंत पवार, श्रीनिवास शेळके, बालाजी वाघमारे, शिवाजी कांबळे यांच्यासह सुधीर गोजमगुंडे, अशोक लोया, अमर पवार, तुळशीदास गंभीरे, रमेश सूर्यवंशी, सुरेश मालू, निवृत्ती ढवळे आणि गुलाब मोहिते उपस्थित होते.
रवाना झालेल्या धान्याच्या ट्रकमध्ये १०२ तेलाचे डबे, साखरेची २३ पोती, गव्हाचे १७६ कट्टे, हरभरा डाळीचे ६२ कट्टे, तूर डाळीचे ७ कट्टे, एक मीठाचे पोते तसेच चिंचेचा एक कट्टा यांचा समावेश होता.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानोबा साखरे, सुधीर बोरुळे, संजय माने, बालाजी जाधव, डिगंबर माळवदे, व्यंकट शिंदे, नवनाथ कवितगे, श्रीराम गायकवाड, सुरेश देशमुख, जयकुमार गोरे आणि बाजार समितीतील विविध घटकांनी मोलाचे योगदान दिले.
-
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis