
नंदुरबार, 25 जून (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नंदुरबार येथे तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विशेष शिबिर व जनजागृती मोहिमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. मंगळवार, 23 जून 2026 रोजी जिल्हा परिषद समोरील टोकरतलाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हे शिबिर पार पडले.
या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण 45 तृतीयपंथी व्यक्तींनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. समाज कल्याण निरीक्षक सचिन जगताप यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली. तसेच शासकीय अभियोक्ता ऍड. बी. एस. बिरारे आणि ऍड. सीमा खत्री यांनी तृतीयपंथीयांसाठी लागू असलेल्या तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, 2019 व नियम 2020 मधील तरतुदी, हक्क व संरक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या शिबिरात 18 तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच रेशन कार्ड सहाय्य मोहिमेत 17 अर्ज भरून घेण्यात आले, तर आधार कार्ड व मतदार नोंदणी मोहिमेत 15 व्यक्तींच्या आधारविषयक अडचणी दूर करून नोंदणी पूर्ण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पवार यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर