‘दोन थेंब जीवनाचे’; रायगडसाठी प्रशासन सज्ज
रायगड, 25 जून, (हिं.स.)। : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. २८ जून) मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असून ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८९ हजार २७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकही
Vaccination drive for a polio-free Raigad


रायगड, 25 जून, (हिं.स.)। : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी (दि. २८ जून) मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असून ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ८९ हजार २७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पोलिओमुळे कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे पोलिओमुक्त रायगड घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. या मोहिमेच्या तयारीसंदर्भात जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

जिल्हाभरात या मोहिमेसाठी २ हजार ३४१ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे तसेच अन्य निश्चित ठिकाणी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम कामगारांच्या वस्त्या, वीटभट्ट्या, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच दुर्गम भागांतील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित लसीकरण झालेले असले तरी प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी बूथवर लसीकरण केल्यानंतर पुढील काही दिवस आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेणार आहेत. त्यांना तत्काळ पोलिओची लस देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना जवळच्या पल्स पोलिओ केंद्रावर घेऊन जाऊन लसीचे दोन थेंब पाजावेत आणि पोलिओमुक्त रायगड अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande