
सोलापूर, 25 जून, (हिं.स.)। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा शनिवार, 25 जुलै 2026 रोजी साजरा होत असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहील. तसेच सर्वसामान्य भाविकांचे दर्शन सुलभ व कमी वेळेत व्हावे यासाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.आषाढी वारी 2026 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी पालखी मार्ग व पालखी तळांवरील सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. पालखी तळांचे मुरमीकरण, स्वच्छता, पाणीपुरवठा, शौचालये, आरोग्य सेवा, जंतुनाशक फवारणी, हायमास्ट दिवे, स्नानगृहे व हिरकणी कक्ष यांची व्यवस्था तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.तोंडले-बोंडले येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी सुरक्षित मार्गाची व्यवस्था, पिराची कुरोली येथील रस्त्यांची दुरुस्ती तसेच भंडीशेगाव येथील पालखी तळाचा विकास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. वाखरी आणि कॉलेज चौक ते सरगम चौक पुलाचे काम तसेच रस्त्यांच्या साईडपट्ट्यांची दुरुस्तीही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
चंद्रभागा नदी परिसरातील सुरक्षेवर विशेष भर देत होडी चालक व प्रवाशांसाठी लाइफ जॅकेट बंधनकारक करणे, रेस्क्यू पथक तैनात करणे, सूर्यास्तानंतर जलवाहतूक बंद ठेवणे आणि घाटांवर सुरक्षाव्यवस्था वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चंद्रभागा घाटांवर मजबूत बॅरिकेडिंग, घाट दुरुस्ती आणि सीसीटीव्हींची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त केली. यात्रेसाठी पोलीस विभागाकडून 33 वॉच टॉवर उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले की, यात्रेसाठी जिल्हा परिषदेला 61.50 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून 23 ठिकाणी जर्मन हॅंगर, 500 महिला स्नानगृहे, 5 हजार मोबाईल शौचालये, 15 मोबाईल चार्जिंग व्हॅन, मोबाईल आरोग्य दूत, पाणी टँकर व्यवस्था, हिरकणी कक्ष, जोडरस्ते व वृक्षारोपणाची कामे करण्यात येणार आहेत.पंढरपूर नगरपरिषद आणि मंदिर समितीच्या वतीनेही भाविकांसाठी सुलभ व जलद दर्शन व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पार्किंग, माहिती फलक आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड