
बीड, 25 जून (हिं.स.)।
योगामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या ताणतणावाच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच स्वतःला आरोग्याबाबात सुदृढ ठेवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदित्य ग्रुपच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी केले.
बीड शहरातील आदित्य एज्युकेशन ग्रुप संचलित विविध महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ.
आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या विशेष योग महोत्सवासाठी प्रख्यात योगगुरू व 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे ज्येष्ठ साधक विश्वनाथ गडकर, प्रमोद राख आणि योगशिक्षिका अंजली राख यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी कॅम्पसमध्ये उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. केवळ एक दिवस योग न करता
तो दैनंदिन जीवनशैलीचा भाग कसा बनवावा, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी सजगता निर्माण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला सर्वच शाखांमधील प्राचार्यांची प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis